ज्यांना जालन्याचा चकवा म्हणतात, त्या दानवेंनी आम्हालाच चकवा दिलाः हर्षवर्धन जाधवांचा आरोप

0
657
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कन्नड पंचायत समितीच्या निवडणुकीवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. रावसाहेब दानवेंनी आपले पंचायत समिती सदस्य फोडल्याचा आरोप करत ज्यांना जालन्याचा चकवा म्हटले जाते त्या रावसाहेब दानवेंनीच रायभान जाधव कुटुंब आणि कन्नड तालुक्यातील जनतेलाही चकवा दिला, अशा शब्दांत जाधवांनी सासऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

कन्नड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत स्वतंत्र असलेल्या रायभान जाधव विकास आघाडीच्या पाच सदस्यांना आपण सभापतिपदासाठी रुबेना कुरेशी आणि उपसभापतिपदासाठी बनकर यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र रावसाहेब दानवे यांनी माझे पंचायत समिती सदस्य फोडले. माझे पाचपैकी चार सदस्य पळवून नेऊन भाजपने स्वतःच्या एका सदस्याला सभापती केले. हा प्रकार घृणास्पद आहे. भाजपची मस्ती अजूनही जिरलेली दिसत नाही. हा सगळा घटनाक्रम पहाता ज्यांना जालन्याचा चकवा म्हटले जाते, त्या रावसाहेब दानवे यांनी मोठा सहभाग घेतल्याचे मला स्पष्टपणे जाणवते. त्यांनी सहभाग घेतला नसता तर हे चार सदस्य भाजपच्या गळा लागलेच नसते. कुठेतरी घरातूनच द्रोह झाला आहे. रावसाहेब दानवेंनी रायभान जाधव कुटुंब आणि कन्नड तालुक्यातील जनतेलाच चकवा दिलेला आहे, असा माझा आरोप आहे, असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. जाधव यांनी सासऱ्यांचा उल्लेख थेट चकवा म्हणून करत आरोप केल्यामुळे जावई- सासऱ्यातील वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा