पाचपैकी चार मतदारसंघात भाजपला झटका; पुणे, नागपूर, औरंगाबादेत महाविकास आघाडीची सरशी

1
1742
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील शिक्षक- पदवीधर मतदारांनी भाजपला भरभरून पाठिंबा दिला, असा दावा मतदानाच्या दिवशीच करणाऱ्या भाजपला राज्यातील मतदारांनी चांगलाच झटका दिला असून पुणे, नागपूर, औरंगाबाद या तीन  पदवीधर आणि एका शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचेच उमेदवार आघाडीवर असून भाजपच्या उमेदवारांची पिछेहाट होताना दिसत आहे.

 पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड हे सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे संग्राम देशमुख हे पिछाडीवर गेले आहेत. पुणे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हेच आघाडीवर आहेत. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार हे तिसऱ्या क्रमांकावर असून विद्यमान आमदार, अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे १७ हजार ३७२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना २७ हजार ८७९ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना १० हजार ९७३ मते मिळाली आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघातही पहिल्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी हे ४ हजार ८५० मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना पहिल्या फेरीत १२ हजार ६१७ तर भाजपचे संदीप जोशी यांना ७ हजार ७६७ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत २८ हजार मतांची मोजणी करण्यात आली. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ३ हजार १३१ मते घेऊन आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या फेरीअखेर २ हजार ३०० मते मिळाली.

एक प्रतिक्रिया

  1. बालेट पेपरची कमाल आहे संपूर्ण देशात आता EVM मशिन न वापरता बालेट पेपर ने निवडूक झाली तर खूप चांगले होईल कारण माझं मला मतदान केले त्याचं समाधान तरी मिळेल EVM मशीन ने तर आपल्या मताचा काहीच उपयोग होत नाही कारण ते एक चीटिंग आहे
    माझी विनंती आहे की या पुढे EVM मशीनचा वापर करू नये हि विनंती

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा