पदवीधर/शिक्षक निवडणूकः ‘तुम्ही पुन्हा येऊ नका’ हाच महाराष्ट्रातील जनतेचा भाजपला संदेश

0
305
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः दोन- तीन महिन्यांत आपलीच सत्ता येणार आहे, असे दावे करत विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी चांगलाच झटका दिला असून ठाकरे  सरकारच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब पाचपैकी चार जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या आहेत. हातची सत्ता गेल्यानंतर वारंवार पुन्हा आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचे वारंवार दावे करणाऱ्या भाजपची जनमानसातील पत गेल्याचेच हा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले असून ‘तुम्ही पुन्हा येऊ नका,’ असा संदेशच जणू या निकालांनी दिला आहे.

भाजपचा बालेकिल्ला समजण्यात येणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा सपाटून पराभव केला. हा मतदारसंघ गेली पाच दशके भाजपच्या ताब्यात आहे आणि ‘मी पुन्हा येईन’चे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्लाही आहे. बालेकिल्ल्यातील मतदारांनीच भाजपला नाकारले आहे. हा संघभूमीवर दीभाभूमीचा विजय आहे, अशी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणूनच बोलकी आहे.

 पुणे पदवीधर मतदार मतदारसंघातून अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या महाविकास आघाडीच्या दोन्हीही उमेदवारांनी बाजी मारली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. पुणे पदवीधर मतदारसंघही भाजपचा गड मानला जात होता, पण तो गडही ढासळून गेला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक शिरीष बोराळकर यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी ५६ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे.

या पाच मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्रफळ तब्बल २३ जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. ३६ पैकी २३ जिल्ह्यातील सर्व वयोगट आणि घटकांतील पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदान केलेले असल्यामुळे या निवडणुकीचे निकाल हा महाराष्ट्रातील जनमताचा कौलच मानला जात आहे. या निवडणुकीच्या निकालातून भाजपची जनसामान्यातील पत घसरल्याचा अर्थही काढला जाऊ लागला आहे.

कोण काय म्हणाले?

वाचाळ बडबड करणाऱ्यांना चपराकः ”शिक्षक, पदवीधर मतदार आमच्या पाठीशी आहेत, हे सिद्ध झाले आहे. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावे घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळवीरांना फार जबरदस्त चपराक आहे. लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय, हे स्पष्ट झाले आहे.”
अजित पवार, उपमुख्यमंत्री

 देवेंद्र फडणवीसांचाही पराभव करूः ”राज्यात ऑपरेशन लोटसच्या वल्गना करण्यात येत होत्या. अनेकदा तीन चाकी सरकार म्हटले जात होते. परंतु महाविकास आघाडीची ताकद भाजपला लक्षात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होण्याइतकी भक्कम ही आघाडी आहे.”
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

 ही महाविकास आघाडीच्या कामाला पोच पावतीः ”या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटित प्रयत्नातून हा विजय साकारला आहे. हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.”
खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा