राज’रंग’ बदललेः तिथीप्रमाणेचाच आग्रह धरणाऱ्या मनसेने साजरी केली तारखेप्रमाणे शिवजयंती!

0
239

औरंगाबादः राजकीय अस्तित्वाच्या शोधात भगवा झेंडा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाची वाट धरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने( मनसे) आज पहिल्यांदाच तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्यामुळे शिवरायांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी केली पाहिजे, हा जुना हट्ट मनसेने सोडून दिला की काय, अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्रासह देशभर हर्षोल्हासाने साजरी करण्यात येत आहे. शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा आणि हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेला भगवा झेंडा अशा वातावरणामुळे सारा आसमंत दुमदुमून निघत असतानाच तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करणार्‍या शिवप्रेमींच्या गर्दीत मनसेचे कार्यकर्तेही दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगाबादेत तर मनसेचे कार्यकर्ते तर भलेमोठे व्यासपीठ थाटून शिवप्रेमींचे स्वागत करतानाही दिसू लागले आहेत. औरंगाबादेत एप्रिल महिन्याच्या आसपास महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांवर डोळा ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच मनसेचे कार्यकर्ते पहिल्यांदाच तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करताना दिसत आहेत, असे काही शिवप्रेमींचे म्हणणे आहे.

 काय म्हणाले होते राज ठाकरे?

”छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर सण आहे. जर आपण सण तिथीप्रमाणे साजरे करतो, तर महाराजांची जयंती तारखेप्रमाणे का? आपण दिवाळी, गणपती किंवा अन्य कोणताही सण हे तारखेनुसार साजरे करतो का? मग शिवाजी महाराज हे दैवत आहे. त्यांची जयंतीही तिथीप्रमाणेच व्हावी.”

– राज ठाकरे, मनसे प्रमुख

( दिनांक 16 मे 2018 रोजी महाड येथे बोलताना)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा