‘परमबीर सिंगांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यावरच का झाली?’

0
153
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः परमबीर सिंग यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण पोलिस आयुक्तपदावरून हटवले गेल्यानंतरच का झाली? आधी का नाही झाली?,  असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला  असून बार आणि रेस्टॉरंट्सकडून १०० कोटींचे टार्गेट अनिल देशमुखांकडून दिले गेले हा आरोप लांच्छनास्पद आहे, असेही राज म्हणाले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असतानाच राज ठाकरे यांनी या मुद्यावर आपले परखड मत मांडले.

माझ्यासाठी अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. मुकेश अंबानी यांच्या घराखाली पोलिसांनी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली. ती कोणी, कोणाच्या सांगण्यावरून आणि का ठेवली? त्याची चौकशी होणार आहे का? हा महत्वाचा मुद्दा आहे. राजीनामा दिला, चौकशी सुरू झाली की नंतर तुम्ही विसरून गेलात…, असे राज ठाकरे म्हणाले.

 पोलिस कोणीतरी सांगितल्याशिवाय अशाप्रकारचे कृत्य करणार नाहीत. अनिल देशमुखांची चौकशी होईल, पण याचीही चौकशी झाली पाहिजे. पण आपण तिसरीकडेच चाललो आहोत. प्रत्येकवेळी विषय येतो, तेव्हा त्याला फाटे फुटत जातात, असेही राज म्हणाले.

राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांनाही चिमटा काढला. माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे. त्यांना गाणे गाण्याची सवय आहे. गाणे गाताना ते तान देतात आणि ती इतकी जाते की नंतर ते मूळ गाणे विसरतात. मग ते कोणते गाणे गायचे हे विसरायचे. तुमचे सगळे असे सुरू आहे. कशापासून सुरूवात झाली या गोष्टी आपण पाहतच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा