शिवसेनेचा मनसेला झटकाः मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवबंधनात!

0
233

मुंबईः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महत्वाचा शिलेदार आज शिवबंधनात अडकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी मनसेला रामराम ठोकून आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने मनसेला दिलेला हा जोरदार धक्का समजला जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य शिरोडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई उपस्थित होते.

आदित्य शिरोडकर हे मनसेचे तगडे युवा नेते होते. शिवसेनेत असताना ते भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेनेत सक्रीय होते. राज ठाकरे यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाबरोबरच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली होती.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली तशी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक पक्षात इन्कमिंगही सुरू झाले आहे. ऐन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आदित्य शिरोडकर यांच्यासारखा तगडा युवा नेता शिवसेनेत  दाखल झाल्यामुळे त्याचा शिवसेनेला मोठा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा