खा. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद नाकारल्यामुळे बीड जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र

0
497
संग्रहित छायाचित्र.

बीडः केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे स्थान जवळपास निश्चित मानली जात असतानाच त्यांचा पत्ता कट करून डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या निर्णयावर आपला आक्षेप नाही आणि मी नाराजही नाही, परंतु माझे समर्थक नाराज असू शकतात, असे सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात खा. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद ही आठरापगड जातींची इच्छा होती. ज्या काळी भाजपला शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून हिणवले जात होते, तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी गाव आणि वस्त्यापासून देश पोहोचवले. मात्र आज त्यांच्याच वारसांना मानेत बुक्क्या मारण्याचे पाप भाजपमधील काही नेते करत आहेत, असे सांगत भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिलेले स्पष्टीकरण आणि सर्जेराव तांदळे यांच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्हा भाजपमध्ये राजीनामा सत्रच सुरू झाले आहे.

हेही वाचाः मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचे एक मत वाढले तरी स्वागतचः पंकजा मुंडेंचा खोचक टोला

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, जिल्हा परिषद सदस्या सुविता हबडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव जाधव, सोशल मीडिया सेलचे प्रमुख अमोल वडतीले, तालुका अध्यक्ष महादेव खेडकर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह जवळपास २० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन भाजप नेतृत्वाविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. या सर्वांनी त्यांच्या पदाचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले आहेत.

आपल्याकडे शनिवारी पक्ष पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य असे जवळपास २० जणांचे राजीनामे आले असून ते पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्यात येतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष मस्के म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खा. प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. भागवत कराड यांना स्थान देण्यात आल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारापासूनच सुरू होती. मुंडे भगिनी समर्थक त्यांच्या भावना सोशल मीडियातून तीव्रतेने मांडतही होते. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती.

पक्षाच्या निर्णयावर आपला आक्षेप नाही आणि मी नाराजही नाही. परंतु माझे समर्थक नाराज असू शकतात, असे त्या म्हणाल्या होत्या. ज्यांना मंत्रिपद मिळाले, त्यांच्यामुळे भाजपचे एकही मत वाढले तरी त्याचे स्वागतच आहे, असा खोचक टिप्पणीही पंकजा मुंडे यांनी केली होती.

 आपण नाराज नाही, हे सांगण्यासाठी पंकजा मुंडे यांनी ही पत्रकार परिषद घेतली असली तरी त्यांच्या विधानांतून त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यामुळे आधीच संतप्त झालेले त्यांचे समर्थक आणखीच संतप्त झाले आणि त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे. आता भाजप नेतृत्व या राजीनामा सत्राकडे कसे पाहते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा