खा. प्रीतम मुंडेंचा पत्ता कट केला कुणी?, मोदी मंत्रिमंडळात ‘खऱ्या ओबीसी’ चेहऱ्यावर अन्याय!

1
2291
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बहुजन समाजापर्यंत भाजपची पाळेमुळे पोहोचवणारे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारस खासदार प्रीतम मुंडे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान जवळपास निश्चित होते, अशी चर्चा असतानाच ऐनवेळी त्यांचा पत्ता कट औरंगाबादचे डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांत प्रचंड अस्वस्थता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या वारसदार असलेल्या मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय केला जात असल्याची चर्चा आधीपासूनच होत असताना बुधवारच्या मंत्रिमंडळ विस्ताराने त्यावर जणू शिक्कामोर्तबच करून टाकले आहे, असे राजकीय जाणकारांना वाटते.

गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपमधील नेत्यांनीच हा पराभव घडवून आणल्याची टीका झाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावताना पंकजा मुंडे यांना क्लिनचीट दिली होती खरी, परंतु प्रत्यक्षात चिक्की घोटाळ्याचे प्रकरण फडणवीस यांच्याच मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर पडल्याची चर्चा झाली आणि तेव्हापासून मुंडे-फडणवीस यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.

पंकजा मुंडे यांनी ‘मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे,’ अशी इच्छा बोलून दाखवल्यानंतर तर पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी सुरेश धस यांच्याकडे बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व सोपवण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ऊसतोडणी कामगारांतील जनाधार कमी करण्यासाठीच ही चाल खेळण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात झाली होती.

मोदी सरकारच्या नुकत्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यानंतर सर्वात आघाडीवर नाव होते ते बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे. मात्र ऐनवेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. भागवत कराड हे ओबीसी आणि वंजारी आहेत, हे खरे असले तरी भाजपला ‘खरा ओबीसी चेहरा’ गोपीनाथ मुंडे यांनी मिळवून दिला. तोच ‘खरा चेहरा’ केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आला आणि एक प्रकारे राजकीय वितुष्टाचे उट्टे काढण्यात आले, अशी चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसू लागली आहे.

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. माझ्याकडे राज्याची सूत्रे द्या, चार महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देऊ शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, अशी गर्जना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. अशातच आता मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा ‘खरा ओबीसी चेहरा’ डावलून कराडांची वर्णी लावण्यात फडणवीस यशस्वी झाल्यामुळे त्यांचे खरे ओबीसी प्रेमही उजागर झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांचेच बोट धरून राजकारणात आलेले डॉ. भागवत कराड मुंडेंच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय झाले. डॉ. कराड यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली, तेव्हाही फडणवीसांकडून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी फडणवीसांनी ही चाल खेळल्याची चर्चा रंगली होती, परंतु डॉ. भागवत कराड हे माझेच नेतृत्वा मानून पुढे जात आहेत, असे सांगून पंकजा मुंडे यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. भागवत कराड हे वंजारी समाजातील असले तरी राज्यातील ओबीसी किंवा वंजारी समाजात त्यांचा फारसा प्रभाव नाही आणि त्यांचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमताही नाही. त्यांच्या मर्यादा आहेत. त्यांना संसदीय राजकारणाचा कुठलाच अनुभव नाही. त्या उलट प्रीतम मुंडे यांची लोकसभेची ही दुसरी टर्म आहे. त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत तर कराड हे राज्यसभेवर वर्णी लावलेले नेते आहेत. औरंगाबादचे महापौरपद भूषवलेल्या डॉ. कराडांची गोपीनाथ मुंडे हीच खरी राजकीय ताकद आणि ओळख होती. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तार करताना ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधले असे म्हटले जात असले तरी त्यात राजकीय शह-काटशह देण्याचेच राजकारण झाल्याचे दिसते.

सोशल मीडियावरील या काही बोलक्या प्रतिक्रियाः

  • महाराष्ट्र मध्ये भटजी, शेठजी ह्या भाजपच्या पक्षाला बहुजन समाजाची ओळख देण्याचे काम गोपीनाथ मुंडे ह्यांनी केले.फडणवीस ने मुंडे घराणे संपवण्याचे ठरवले आहे. आधीच पंकजा ह्यांना निवडणुकीत हरवले आणि आता त्याच्या विरूद्ध सुरेश धस ह्यांना उभे करून आव्हान दिले आहे. बहुजन समाज कधी सुधरणार? @ अनुज पाठक
  • मुंडे भगिनिंना तुम्ही कितीही पाण्यात पाहण्याचा प्रयत्न करा एक दिवस त्या तुम्हाला तुमचं नाक घासायला भाग पाडतिल. मुंडे भगिनिंना डावलन्यात फक्त तुमचा वाटा आहे ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. याची किंमत तुम्हाला निश्चित चुकवावी लागेल.@ मनोज बांगर
  • मोदींना फक्त होयबा पाहीजेत म्हणून पंकजा ताईना मंत्री नाही केले, मोदींना खरेच ओबीसी नेतृत्वाला संधी द्यायची असती तर प्रीतम मुंडे नव्हे तर पंकजा मुंडेना कॅबिनेट मंत्रीपद दिले असते, फक्त फडणवीस यांच्या विरोधामुळे त्यांचे मंत्रीपद हुकले. @ ओबीसी महासंघ

एक प्रतिक्रिया

  1. मुळात हे ब्राम्हण शाही राबवणारे सरकार आहे पाठून खनजीर खुपसण्याची त्यांची सवय आहे हा इतिहास आहे…
    ओबीसी असो वा दलित, वा असो आदिवासी यांना फक्त यांच्यावर राज्य करायचे आहे त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात म्हणून ओबीसी आणि इतर समाजाचा नेत्यांनी यावरून शिकायला हवे

    आपले कोण आणि परके कोण ?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा