मोदी सरकार नरमले, कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर चर्चेचे निमंत्रण!

0
58
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा पवित्रा पाहून अखेर सरकार नरमले असून आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आंदोलन करू नका, ३ डिसेंबरला चर्चा करू, असा सांगावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिला आहे.

 मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांबाबत देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष  निर्माण झाला असून या कायद्याविरोधात राजधानी दिल्लीवर धडक देण्यासाठी हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी निघाले आहेत. मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा करून त्यांना दिल्लीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आणि सरकारची दडपशाही झुगारून राजधानीच्या दिशेने कुच करत निघाले.

 चलो दिल्लीचा नारा देत निघालेले हे शेतकरी आज आणि उद्या केंद्राच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे आंदोलक आणखीच आक्रमक झाले आहेत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एवढ्या मोठ्या जनसमुदायाला सामोरे जाऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगून टाकल्यामुळे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले आणि सरकारने शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकार त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन थांबून ३ डिसेंबरला चर्चेसाठी यावे, असे तोमर म्हणाले. एकीकडे चर्चेचे निमंत्रण देतानाच नवीन कृषी कायदे ही काळाची गरज होती. हे कायदे येत्या काळात क्रांतिकारक बदल घडवून आणतील, असेही तोमर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या कायद्यांना विरोध करणारे शेतकरी चर्चेसाठी तयार होतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा