शेतकरी आंदोलनः १ हजार १७८ खाती बंद करण्याचे मोदी सरकारचे ट्विटरला निर्देश, तणाव वाढणार?

0
108
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत करण्यात येत असलेल्या ट्विट्सवरून मोदी सरकार आणि ट्विटर यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो. पाकिस्तान आणि खलिस्तानशी सहानुभूती बाळगत असल्याचे सांगत मोदी सरकारने ट्विटरला १ हजार १७८ ट्विटर खाती बंद करण्यास सांगितले आहे.  काही दिवसांपूर्वी सरकारने १०० ट्विटर खाती आणि १५० ट्विट्स काढून टाकायला लावले होते. त्यानंतर काही तासांनीच एकतर्फी निर्णय घेत ट्विटरने ही सर्व खाती आणि ट्विट्स पूर्ववत केली होती. त्यावरून सरकारने एक तर आदेशाचे पालन करा आणि अन्यथा परिणाम भोगा, असा इशारा टविटरला दिला होता. त्यामुळे आता ट्विटर आणि सरकारमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारने सांगितलेल्या ट्विटर खात्यांवर काही कारवाई की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ट्विटरने कारवाई केली तर त्यांच्यासाठी ही मोठी अडचण ठरेल. कारण सरकारच्या निर्देशानुसार ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांचेही खाते सरकारी कारवाईच्या अखत्यारित येणार का? असा प्रश्न असून ते शेतकरी आंदोलनाबाबत शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या काही ट्विट्सला लाईक करतात. शेतकरी आंदोलनाबाबत परदेशी सेलिब्रेटींनी केलेल्या ट्विट्सला डोर्सी यांनी लाइक केलेले आहे. त्यामुळे ट्विटरकडून सरकारच्या निर्देशांच्या विरोधात पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरने असे पाऊल उचलले होते.

हेही वाचा: शेतकरी आंदोलनावर संसदेत मोदी म्हणालेः आंदोलन संपवा, सगळे एकत्र बसून चर्चा करू!

भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला नोटीस बजावल्याची बातमी आली होती. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी बंद केलेली ट्विटर खाती पुन्हा सुरू केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली होती. कलम ६९ अनुसार निर्देशांचे पालन न केल्यामुळे ट्विटरला परिणामाला सामोरे जाण्याचा इशारा देणारी ही नोटीस होती. आधी सरकारने ३१ जानेवारीला २५० ट्विटर हँडलची यादी दिली होती आणि शेतकरी आंदोलनावर हॅशटॅगशी संबंधित ट्विट्स आणि ट्विटर खात्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. १ फेब्रुवारीला १०० ट्विटर खाती आणि १५० ट्विट्स ट्विटरवरून हटवण्यात आले होते.

हेही वाचाः संघर्ष चिघळणारः ठाकरे सरकार करणार राज्यपाल कोश्यारींविरुद्ध कायदेशीर कारवाई!

आता सरकारने दिलेल्या ताज्या यादीत १ हजार १७८ ट्विटर हँडलचा समावेश आहे. हे ट्विटर पाकिस्तानी आणि खलिस्तानी यूजरशी संबंधित आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. ४ फेब्रुवारी रोजी ट्विटरला सरकारने ही यादी दिली आहे. परदेशी भूमीतून संचलित केले जाणारे हे ट्विटर हँडल सुरक्षा संस्थांनी हे ट्विटर शोधून काढले होते. यातील बहुतांश ट्विट्स चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यांच्या ट्विट्समुळे शेतकरी आंदोलनातील शांतता भंग होऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे. ट्विटरने सरकारच्या या आदेशावर अद्याप पूर्णतः कारवाई केलेली नाही आणि सरकारच्या या आदेशाला आव्हानही दिलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा