सत्ता गेल्याचे उट्टे काढले: मोदी सरकारने प्रजासत्ताकदिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली!

0
104
पंढरीची वारी या विषयावर महाराष्ट्राने २०१५ मध्ये सादर केलेला चित्ररथ.सौजन्य:विकिपीडिया.

मुंबईः नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात 2015 नंतर पश्चिम बंगालच्या चित्ररथाला सलग दोनवेळा परवानगी नाकारणाऱ्या  मोदी सरकारने यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथालाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे चांगलेच राजकारण तापले असून विरोधकांनी मोदी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे.

 राजपथावर होणाऱ्या यंदाच्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ मराठी रंगभूमीची 175 वर्षे या संकल्पनेवर साकारण्यात येणार होता. मात्र अमित शाहांचे केंद्रीय गृह मंत्रालय आणि राजनाथ सिंहांच्या संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दोनवेळा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनात दिसणार नाही. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या  पथसंचलनात निवडक राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी होत आला आहे. महाराष्ट्राने 2015 मध्ये पंढरीची वारी आणि 2018 मध्ये शिवराज्याभिषेक या संकल्पनेवर सादर केलेल्या चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावले होते. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक, 1983 मध्ये बैलपोळा,1993 ते 1995 अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव शताब्दी, हापूस आंबे, आणि बापू स्मृती अशा चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावले होते. यंदाचा महाराष्ट्राचा प्रस्ताव विलंबाने आल्याचे कारण सांगून परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण देण्यात येत असले तरी महाराष्ट्राच्या विधानसभा  निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेला मुकावे लागल्याचे उट्टे या निमित्ताने काढण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे.

 केंद्राला कोणाचा घोडा पुढे सरकवायचे आहे?: राजपथावरील संचलनात महाराष्टाराचा चित्ररथ नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी अनेकदा प्रथम क्रमांकही पटकावले आहेत. असे असताना महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणाचा घोडा पुढे सरकवायचा आहे? काँग्रेस राजवटीत हा प्रकार घडला असता तर महाराष्ट्र भाजपने बोंबाबोंब केली असती. आज ते गप्प का? महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताकदिनी दिसू नये यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत, हा आमचा गुन्हा आहे का?, असे सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टिकास्त्र सोडले आहे.

 विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्न वागणूकः प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधीत्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत आहे. विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देत आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारणे हा येथील जनतेचा अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

…हा तर संघराज्याच्या मूळ गाभ्यालाच धक्काः महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांना पवानगी नाकारणे हे गंभीर आहे.त्यातही महाराष्ट्राचा रथ नाकारणे हा आमच्या राज्याच्या अस्मितेचा अपमान आहे. केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारून भारतीय संघराज्याच्या मूळ गाभ्यालाच धक्का लावला आहे. एखादी गोष्ट जर तुमच्या विरोधात असेल तर त्यात रस घ्यायचा नाही, हा खरे तर बालिशपणा आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा