मोदी सरकारने जाहिरातबाजीवर दिवसाला खर्च केले १.९५ कोटी रुपये, वर्षभरात ७१३.२० कोटी!

0
367
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः ‘सबका साथ सबका विकास’चा नारा देणाऱ्या मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक, मुद्रित आणि अन्य माध्यमांवर जाहिरातबाजी करण्यासाठी दरदिवशी १ कोटी ९५ लाख रुपये खर्च केला आहे. वर्षभराचा हा खर्च तब्बल ७१३ कोटी २० लाख रुपये आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या अवाढ्य खर्चातून नेमक्या कोणत्या प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या, हेच अद्याप स्पष्ट नाही.

 आरटीआय कार्यकर्ते जतीन देसाई यांनी माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. देसाई यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ ऑऊटरिच अँड कम्युनिकेशनकडे (बीओसी) मोदी सरकारने २०१९-२० मध्ये जाहिरातबाजीवर किती खर्च केला याची माहिती मागवली होती. देसाई यांना बीओसीने दिलेल्या उत्तरात गेल्या आर्थिक वर्षात जाहिरातबाजीवर ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

 गेल्या आर्थिक वर्षात जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आलेल्या ७१३ कोटी २० लाख रुपयांपैकी सर्वाधिक जाहिराती इलेक्ट्रॉनिक माध्यमांना देण्यात आल्या असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातबाजीवर ३१७ कोटी ०५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ मुद्रित माध्यमांतील जाहिरातबाजीवर २९५ कोटी ०५ लाख रुपये आणि अन्य माध्यमांतील जाहिरातबाजीवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

मोदी सरकारने एका वर्षभरात जाहिरातबाजीवर खर्च केलेल्या ७१३ कोटी २० लाख रुपयांचा आकडा पाहता सरकारने दरदिवशी जाहिरातबाजीवर १ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत. परदेशी माध्यमांतील जाहिरातबाजीवर किती रुपये खर्च झाले, याचा कोणताही तपशील ब्युरो ऑफ ऑऊटरिच अँड कम्युनिकेशनकडे (बीओसी) उपलब्ध नाही. गेल्या आर्थिक वर्षात ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च करून कोणत्या प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या हेही अद्याप स्पष्ट नसल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा