भीमा-कोरेगाव, एल्गार परिषद प्रकरणाचा तपास मोदी सरकारने परस्पर एनआयएकडे सोपवला !

0
187
संग्रहित छायाचित्र.

 नवी दिल्ली/ मुंबईः भीमा-कोरेगाव दंगल हे फडणवीस सरकारचे षडयंत्र होते. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून दोनही दिवस उलटत नाहीत तोच मोदी सरकारने भीमा- कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास परस्पर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शह दिला आहे.

 राज्यातील फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार जाऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भीमा-कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषद प्रकरणाचा आढावा घेण्याचे काम सुरू होते. भाजप सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या बुद्धीवंतांना शहरी नक्षलवादी ठरवून त्यांना तुरूंगात डांबणे हे भाजपचे षडयंत्र होते, असे आरोप महाविकास आघाडीचे नेते उघडपणे करू लागले होते. त्यातच या प्रकरणी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतल्यानंतर या दोन्ही प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्याचेही काम राज्य सरकारने सुरू केले होते. अशातच मोदी सरकारने या दोन्ही प्रकरणांचा तपास राज्य सरकारकडून काढून घेऊन तो एनआयएकडे वर्ग केला आहे. एनआयएने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना हा निर्णय कळवला असून पुढील तपास एनआयए करणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरणी फडणवीस सरकारने दलित कार्यकर्ते, विचारवंत आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन आणि व्हॉट्सअप मेसेज टॅप केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने आजच चौकशीचे आदेश दिले असताना मोदी सरकारने ही खेळी खेळली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा