काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच भाजपने घातला एनआरसीचा घाटः प्रकाश आंबेडकर

0
194

मुंबईः केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील मोदी सरकारला काही लोकांना बाद करायचे आहे. काही लोकांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवून त्यांचा मताधिकार काढून घ्यायचा आहे. एनआरसी लागू करण्यामागचा मोदी सरकारचा हाच हेतू आहे. आरएसएस, भाजपची विचारसरणी रुजवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जात आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायदा( सीएए) आणि एनआरसीच्या विरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

एनआरसीचा फटका केवळ मुस्लिमांनाच बसणार नाही तर तो हिंदूंनाही बसणार आहे. आसाममध्ये राबवण्यात आलेल्या एनआरसीमध्ये 19 लाख लोक घुसखोर ठरले. त्यापैकी 14 ते 15 लाख हिंदू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एनआरसीवरून देशाशी खोटे बोलत आहेत. त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण आरएसएस ही संघटनाच खोटेपणाच्या पायावर उभी आहे. एनआरसीबद्दल मंत्रिमंडळ किंवा संसदेत कधीच चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शाह एनआरसी लागू करण्याची घोषणा लोकसभेत कशी काय करतात?, असा सवाल त्यांनी केला. ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागले आहे. त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागले आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ( आरएसएस) आणि भाजपचे आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीहून लक्ष विचलित करण्यासाठीच मोदी सरकारने सीएए आणि एनआरसीचे मुद्दे उकरून काढले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीची मुंबईत धरणे.

 भिडे- एकबोटेंना पाठीशी घालणारांची चौकशी कराः भीमा- कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पाठीशी घालणारांची चौकशी करा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. भीमा-कोरेगावात झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी पोलिसांवर टाकून स्वतः नामानिराळे राहाण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. मात्र त्यावेळी पोलिसांना कारवाईचे आदेश देणारांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना मोक्का का लावण्यात आला नाही? त्यांना कोणी वाचवले?, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा