मोदी म्हणाले, गरिबांची प्रतिष्ठा वाढली!

0
539
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षाच्या पूर्ततेनिमित्त देशवासियांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरिब आणि स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल आणि काही जणांचे मृत्यू होत असताना या पत्रात मोदी यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत भारताची ऊंची खूपच वाढली, गरिबांची प्रतिष्ठाही वाढली आहे, असे म्हटले आहे. स्वतःला जनतेचा प्रधानसेवक संबोधतानाच मोदींनी या पत्रात त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात प्रचंड टिकेचा विषय बनलेले नागरिकत्व दुरूस्ती कायदा, जम्मू काश्मीरसाठी असलेले संविधानातील कलम ३७० हटवणे, विकास आणि ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ हे मुद्दे सरकारची मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटापैकी एक कोरोना महामारी आणि स्थलांतरित मजुरांचे हाल याचा त्यांनी या पत्रात काही ओळींतच उल्लेख केला आहे.

 मोदी सरकारच्या मागील एक वर्षातील काही निर्णयांचा मोदी यांनी या पत्रात उहापोह केला. कलम ३७० ने राष्ट्रीय एकता आणि एकीकरणची भावना वाढवली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वसम्मतीने दिलेला राम मंदिराचा निर्णय शतकानुशतके चालू असलेल्या चर्चेला एका सौहार्दपूर्ण अंतापर्यंत घेऊन आला. तीन तलाकच्या कुप्रथेला इतिहासाच्या कचराकुंडीपर्यंत सिमीत करण्यात आले. नागरिकत्व अधिनियमातील दुरूस्ती भारताच्या सहानुभूती आणि समावेशाच्या भावनेची अभिव्यक्ती होती, असे मोदी या पत्रात म्हणतात. या वर्षीचा प्रत्येक दिवस माझ्या सरकारने हे निर्णय घेण्यासाठी आणि लागू करण्यासाठी २४ तास पूर्ण जोशात काम केले, असेही मोदी यांनी या पत्रात म्हटले आहे.

मोदींनी या पत्रात कोरोनाचाही उल्लेख केला. मात्र इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर ते फारसे बोलले नाहीत. एवढ्या मोठ्या संकटात कोणालाच अडचणी आल्या नसतील किंवा असुविधा झाली नसेल असा दावा केला जाऊ शकत नाही. लघु उद्योगातील आपले मजूर, स्थलांतरित कामगार, कारागीर आणि शिल्पकार, फेरीवाले आणि अशा देशवासियांना त्रास सहन करावा लागला. आम्ही त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी एकजूट आणि दृढ पद्धतीने काम करत आहोत, एवढेच मोदी यांनी या पत्रात म्हटले आहे.

२०१४ ते २०१९ दरम्यान भारताची ऊंची खूपच वाढली. गरिबांची प्रतिष्ठा वाढवण्यात आली, असे मोदींनी पत्रात लिहिले आहे. मला विश्वास आहे की अर्थव्यवस्था कोरोना संकटातून सावरेल. यासाठी भारत हा इतर देशांसाठी प्रेरणा ठरेल. अर्थव्यवस्था क्षेत्रात १३० कोटी भारतीय जगाला केवळ आश्चर्यचकितच करणार नाहीत तर त्यांच्यासाठी प्रेरणादायीही ठरतील, असेही मोदी यांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा