‘गद्दारां’ना गोळ्या मारण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचीच चिथावणी, देशभर संताप

0
116
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली:  देशाचा केंद्रीय मंत्रीच जर कुणाला गोळ्या घालण्याची भाषा करू लागला, कुणाला मारून टाकण्यासाठी लोकांना चिथावणी देऊ लागला तर तुम्ही काय म्हणाल? केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीच्या रिठाला विधानसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत भाषण दिल्यानंतर सभामंचावरूनच ‘देश के गद्दारों को…’ अशा घोषणा दिल्या आणि त्यांच्या समारो उभ्या असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो सालों को…’  असा प्रतिसाद दिला. ठाकूर यांनी वारंवार अशा घोषणा दिल्या आणि भाजप कार्यकर्त्यांनी तेवढ्याच जोशात त्यांना प्रतिसादही दिला.  अनुराग ठाकूर यांच्या चिथावणीखोरपणामुळे भाजप एका समुदाय विशेषाला टार्गेट करून त्यांच्या विरोधात लोकांना भडकावत असून समाजात विष कालवत असल्याची टीका होऊ लागली आहे.

अनुराग ठाकूर यांच्या या चिथावणीमुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. लोकांना भडकावणारा हा माणूस तुरूंगात असायला हवा. त्याऐवजी तो मोदींच्या मंत्रिमंडळात आहे. भाजपला उमेदवार आणि मंत्रिमंडळ सहकारी म्हणून असेच उपटसूंभ सापडतात, अशी टीका त्यांनी केली आहे.

अनुराग ठाकूर यांच्यासारखा तरूण नेता निवडणूक प्रचारात विखारी घोषणा देतांना पाहून प्रचंड वेदना झाल्या. ही संपूर्ण पक्षाचेच षडयंत्र असल्याचे दिसते, अशी टीका काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे.

याआधी दिल्लीच्या मॉडेल टाऊन विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांनीही अशाच घोषणा दिल्या होत्या. त्यांनी काढलेल्या पदयात्रेत ते ‘देश के गद्दारों को…’ घोषणा देत होते आणि भाजप कार्यकर्ते ‘गोली मारो सालों को…’  असा प्रतिसाद देत होते. याच प्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीच्या बाबरपूर विधानसभा मतदारसंघात एका प्रचारसभेत बोलताना ‘ जेव्हा तुम्ही 8 फेब्रुवारीला व्होटिंग मशीनचे बटन दाबाल तेव्हा ते एवढ्या त्वेषाने दाबा की बटन येथे बाबरपूरमध्ये दबले पाहिजे आणि त्याचा करंट शाहीनबागमध्ये लागला पाहिजे’ असे वक्तव्य केले होते.

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही अनुराग ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. अपेक्षा आहे की, गद्दारांना गोळी मारण्यापासून वेळ मिळाल्यानंतर देशाच्या कनिष्ठ अर्थ मंत्री ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या कारणांना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गोळी मारतील. की  देशाच्या अच्छे दिनलाचा गोळी मिळणार? असा सवाल त्यांनी केला आहे.

लोकांना भडकावण्याची भाजपची रणनिती केवळ दिल्ली विधानसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित नसून संपूर्ण देशातच भाजप नेते विविध ठिकाणी अशी चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी काही दिवसांपूर्वी ‘जे लोक सीएएला विरोध करतील त्यांना कुत्र्याप्रमाणे गोळ्या घातल्या जातील. आमच्या सरकारने उत्तर प्रदेशात असेच केले आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये जिंकलो आणि आमचे सरकार आले तर आम्ही येथेही असेच करू’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप वारंवार विभाजनवादी भाषा का करत आहे? असा सवाल निर्माण होत असून आर्थिकमंदी आणि आपल्या नाकर्तेपणाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामच अशी भाषा वापरली जात असल्याचे दिसू लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा