मोदी व्हायरसची बाधा कोरोना व्हायरसपेक्षा घातकः सचिन सावंतांचा भाजपच्या शायना एनसींना टोला

0
326
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संबंध देश हैरान असतानाच या मुद्यावरून सध्या जोरदार टोलेबाजीही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेला व्हायरस कोरोना व्हायरसपेक्षाही घातक आहे. मोदी व्हायरस तुमचा विवेक मारतो आणि तुम्हाला भक्त बनवतो, असा सणसणीत टोला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांना लगावला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी देशातील १३० कोटी जनतेला जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर ही साथ रोखण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी सायंकाळी पाच वाजता घराची खिडकी, बाल्कनी किंवा गॅलरीत उभे राहून टाळ्या किंवा थाळ्या वाजवायलाही सांगितले. मोदींच्या या आवाहनावर सोशल मीडियावर टिकेची झोड उठल्यानंतर शायना एनसी यांनी समर्थनार्थ एक ट्विट केले. ‘आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी तोड नाही. ते स्टँडिंग ओव्हेशनचे हक्कदार आहेत. पुराणांच्या मते घंटी आणि शंखाच्या आवाजाने बॅक्टेरिया, व्हायरस आदि मरून जातात. त्यामुळे पूजेच्या वेळी आपण घंटी आणि शंख वाजवतो. १२० कोटी लोकांनी घंटी, शंक, टाळी, थाळी वाजवण्यामागे मोदीजींचा विचार किती मोठा आहे,’, असे ट्विट शायना एनसी यांनी केले होते.

 काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह अनेकांनी शायना एनसी यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ‘ मोदींनी असा एक व्हायरस विकसित केला की तो कोरोना व्हायरसपेक्षा घातक आहे. तो तुमच्यातील तर्कबुद्धीला मारून टाकतो आणि तुम्हाला भक्त बनवतो! कोरोनाची बाधा झाली तर त्यातून बाहेर पडण्याची संधी आहे. परंतु मोदी व्हायरसची तुम्हाला बाधा झाली असेल तर तुमचा मेंदू तुम्हाला परत मिळूच शकत नाही. पहा शायना एनसींचे काय झाले…’ अशा शब्दांत सचिन सावंत यांनी शायना एनसी यांचा समाचार घेतला. टिकेची झोड उठल्यानंतर शायना एनसी यांनी हे ट्विट डिलिट करून टाकले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा