पुन्हा अपमानः शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजींच्या चेहऱ्यावर शाहांचा चेहरा!

0
1125
मॉर्फ केलेल्या व्हिडीओतील दृश्य.

नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचे सत्र काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘तान्हाजीः द अनसंग वॉरिअर’ या अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्या ऐतिहासिक चित्रपटातील काही प्रसंग मॉर्फिंग करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा चेहरा लावून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ सायबर सेलला टॅग करून तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणीही होऊ लागली आहे.

मॉर्फिंग केलेल्या या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह तर उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावून दाखवण्यात आलेला आहे. मोदी आणि शाह कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा व्हिडीओ तत्काळ मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा वाईट परिणाम होतील, असा इशारा नेटकऱ्यांनी दिला आहे. ही चित्रफित आपण संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे. त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहात आहे. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या संघटना आता कुठे गेल्या, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा