मान्सून धडकला, २४ तासांत मराठवाड्यात तर पुढील ४८ तासांत उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार!

0
559

मुंबईः राज्यात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने केली आहे. पुढील २४ तासांत मराठवाड्यात तर येत्या ४८ तासांत उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार बरसेल, असा अंदाज आहे.

या वर्षीचा मान्सून गुड मान्सून असेल, असे सांगतानाच यंदा महाराष्ट्रात शंभर टक्के पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातून मान्सून पुढे सरकत आहे. आजपासून पाच दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

 पुढील २४ तासांत दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होईल. नांदेड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसासाठी वातावरण अनुकुल असल्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होण्याचीही शक्यता आहे.

 निसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणताही विपरित परिणाम झाला नाही. ३१ मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ते ३ जूनपर्यंत निवळले. त्यामुळे चक्रीवादळ अरबी समुद्रात रेंगाळले नसल्यामुळे त्याचा मान्सूनच्या स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

१५ जूनपर्यंत सर्वदूर मुसळधारः सध्या मान्सूनला पोषक वातावरण असल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात १५ जूनपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात आजपासूनच मान्सूनचा वेग वाढणार आहे. त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा