मान्सून केरळात धडकला, आठवडाभरात महाराष्ट्रात!

0
188
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा आज भारतीय हवामान खात्याने केली असून याबरोबरच भारतातील चार महिन्यांच्या पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटले आहे.

नैऋत्य मोसमी पावसावरच देशाची शेतीवर आधारित अर्थव्यवस्था अवलंबून असून नैऋत्य मोसमी पावसाचे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळच्या किनारपट्टीवर आगमन होते आणि सप्टेंबरमध्ये राजस्थानमधून मान्सून माघार घेत असतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीत देशात ७५ टक्के पाऊस पडतो.

 स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने शनिवारीच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केली होती. मात्र स्कायमेटचा हा दावा भारतीय हवामान खात्याने फेटाळून लावला होता. आज केरळात आगमन झालेला मान्सून ७ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचेल आणि १७ जूनपर्यंत राज्याचा उत्तर भाग व्यापून टाकेल, असा अंदाज आहे.

 दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत जाणार असल्यामुळे कोकणसह राज्याच्या बहुतांश भागात पुढील चार दिवस पूर्वमोसमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या, २ जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ आणि ४ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर उत्तर कोकणात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा