कोरोना लस घेतल्यानंतर मोरादाबादेत वॉर्ड बॉयचा मृत्यू, कुटुंबीयांच्या आरोपाने खळबळ

0
230
प्रातिनिधिक छायाचित्र.

मोरादाबादः उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. महिपाल सिंग असे या व्यक्तीचे नाव असून शनिवारी कोरोनाची लस घेतल्यापासूनच त्याला अस्वस्थ वाटत होते. महिपालचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळे झाला, असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

महिपाल सिंगने शनिवारी कोरोनाची लस घेतली होती. जिल्हा रुग्णालयात रात्रपाळीची ड्युटी करून परतल्यानंतर त्याने छातीत दुखत असल्याची, श्वास घ्यायला त्रास होत असल्याची आणि खोकला लागत असल्याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

 कोरोनाची लस घेण्यापूर्वी महिपाल सिंगला थोडेसे बरे वाटत नव्हते. परंतु कोरोनाची लस घेतल्यामुळे त्याची प्रकृती जास्तच खालावली, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. महिपालच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल, असे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले असून त्यामुळे खळबळ माजली आहे.

दिल्लीमध्येही कोरोनाची लस घेतल्यामुळे ५१ जणांना रिऍक्शन आली आहे. महाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये तीन परिचारिकांनाही रिऍक्शन आली आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दिल्लीतील ५१ पैकी एका व्यक्तीला गंभीर स्वरुपाचे साइड इफेक्टस् झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. कोलकात्यातही एका ३५ वर्षीय नर्सला कोरोनाची लस घेतल्यानंतर रिऍक्शन आल्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर ती बेशुद्ध पडली होती.

लस घेतल्यानंतर ऍलर्जिक रिऍक्शन असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नर्सबाबत चिंता करण्याचे कारण नाही. अनेक लसी घेतल्यानंतर अशा प्रकारची रिऍक्शन येत असते, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा