मोदी सरकारचा शेतकरी कायद्यामागील हेतूच शंकास्पद, कायदे उद्योगपती धार्जिणेः काँग्रेस

0
27
छायाचित्रः twitter/@bb_thorat

मुंबई मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी कायद्याविरोधातील लढा तीव्र करत काँग्रेसने आज राज्यभर सत्याग्रह आंदोलन केले. मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावले जाणार आहेत. म्हणूनच त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी उभा आहे. शेतकऱ्यांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा हा संघर्ष आहे. मात्र, मोदी सरकारचा या कायद्यामागील हेतूच स्वच्छ नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभर किसान अधिकार दिन पाळत सत्याग्रह करण्यात आला. वर्ध्यातील सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या सत्याग्रहाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,  यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार-थोरातः बापूंनी न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला त्याच मार्गाने आम्ही जात आहोत. केंद्र सरकारचे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणि साठेबाजांच्या हिताचे आहेत. शेतकरी, कामगार यांना चिरडून टाकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्याला आमचा विरोध आहे. हा लढा शेतकऱ्यांसाठी, बहुजनासाठी, गरीब लोकांसाठी आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.  माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीची व्यवस्था निर्माण केली आणि नंतर ती व्यवस्था देशभर पोहचली. ही व्यवस्थाच आता मोडीत काढून शेतकऱ्यांचा आधार काढून घेतला जात आहे. या कायद्यात किमान आधारभूत किंमतीबदद्लची स्पष्ट भूमिका नाही, असा आरोप करत या कायद्यात अनेक त्रुटी असून साठेबाजीला प्रोत्साहन मिळून महागाईचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे हे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा थोरात यांनी दिला.

मराठवाड्यासह राज्यभर सत्याग्रहः सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये सत्याग्रह करण्यात आला. प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे सत्याग्रह करण्यात आला. यासोबतच राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयीही काँग्रेस नेते, पदाधिकारी यांनी सत्याग्रह करून शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांना विरोध व्यक्त केला. शेतकरी विरोधी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा