आता कितीही वेळा देता येणार नाही एमपीएससीची परीक्षा!

0
192

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीमार्फत वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आधी कितीही वेळा देता येत होत्या. मात्र आता या परीक्षा देण्यावर कमाल संधींची मर्यादा घालण्यात आली असून नव्या वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना मात्र कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

एमपीएससीने स्पर्धा परीक्षांच्या पॅटर्नमध्ये काही बदल केले आहेत. यापूर्वी उमेदवारांना एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा कितीही वेळा देता येत होत्या. आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ सहा वेळाच या परीक्षा देता येणार आहेत. मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ वेळा या परीक्षा देता येतील. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मात्र पूर्वी प्रमाणेच कितीही वेळा या परीक्षा देता येतील. त्यांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

उमेदवाराने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिल्यास ती एक संधी मानण्यात येईल. विशेष म्हणजे एखाद्या उमेदवाराने पूर्व परीक्षेचा कोणताही एक पेपर दिला तरीही ती एक संधी समजली जाणार आहे. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तीही त्याची परीक्षेला उपस्थिती ग्रहित धरून एक संधी समजली जाणार आहे.

परीक्षा देण्याच्या कमाल संधींची ही मर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींना अनुसरून घेण्यात येणाऱ्या परीक्षांपासून लागू होणार आहे. यूपीएससीच्या परीक्षांनाही कमाल संधीची मर्यादा आधीपासूनच लागू आहे. आता एमपीएससीनेही यूपीएससीच्या पावलावर पाऊल ठेवत कमाल संधींची मर्यादा लागू केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा