राज्यसेवा पूर्वपरीक्षा २१ मार्चला होणार, एमपीएससीने जाहीर केली तारीख

0
68
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता येत्या रविवारी, २१ मार्च रोजी होणार आहे. एमपीएससीने आज ही घोषणा केली. २७ मार्च रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकीसेवा पूर्वपरीक्षा आणि ११ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट –ब या दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असेही एमपीएससीने जाहीर केले आहे.

१४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा अवघ्या दोन दिवसांवर आलेली असतानाच कोरोनाचे कारण देऊन पुढे ढकलण्यात आल्यामुळे राज्यभरातील उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अहमदनगरसह ठिकठिकाणी उमेदवारांनी रस्त्यावर उतरून एमपीएससीच्या या निर्णयाचा धिक्कार केला होता. शेवटी गुरूवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत ही परीक्षा येत्या आठवडाभरातच होईल आणि या परीक्षेची तारीख शुक्रवारी जाहीर केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार एमपीएससीने आज अधिकृत परिपत्रक काढून तारीख जाहीर केली.

१४ मार्चकरिता नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेशपत्राच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल, असे एमपीएससीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई, वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट, यूपीएससी या परीक्षांसह अनेक परीक्षा झाल्या. या परीक्षा आणि राजकीय नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या वेळी आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी कोरोनाची बाधा झाली नाही आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेलाच कोरोनाचे कारण देऊन अडथळा निर्माण करणे म्हणजे परीक्षार्थींच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे, असा आरोप उमेदवारांनी केला होता. १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राजकारणही चांगलेच पेटले होते. त्यामुळे तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणालाही राजकारण करू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. २०१९ नंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालीच नाही. आधीच आमची दोन वर्षे वाया गेली, अशी व्यथा उमेदवारांनी मांडली होती. त्यावर या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेची अट आडवी येणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा