राज्यसेवा पूर्वपरीक्षा आठवडाभरातच, उद्या तारीख जाहीर होणारः मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
88
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा येत्या आठवडाभरातच होईल. या परीक्षेची तारीख उद्या, शुक्रवारी जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ही परीक्षा आता २१ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.

१४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा कोरोना संसर्गाचे कारण देऊन एमपीएससीने पुढे ढकलली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अहमदनगरसह राज्यभरात उमेदवारांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी पुढे ढकलण्याच्या या निर्णयावर नाराजीचा सूर लावला होता.त्या पार्श्वभूमीवर आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली.

एमपीएससीची परीक्षा लांबणीवर पडल्याने कोणत्याही उमेदवाराला वयोमर्यादेची अट आडवी येणार नाही, अशी ग्वाही देतानाच तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी राजकारण करत असेल तर कृपया अशा लोकांना बळी पडू नका, कोणी भडकवत असेल तर भडकू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना केले आहे. कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा येत्या आठवडाभरातच होईल. काही काळासाठी आपण ही परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना मी तशी सूचना दिल्या आहेत. या परीक्षेची तारीख उद्या शुक्रवारी जाहीर होईल आणि ती येत्या आठवडाभरातीलच असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा