मराठा समाजाला एमपीएससीच्या नोकर भरतीत ईडब्ल्यूएस आणि खुला प्रवर्ग असे दोन पर्याय!

0
121
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमधून आरक्षणाचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) मराठा समाजाच्या म्हणजेच एसईबीसीमधून अर्ज केलेल्या उमेदवारांना  आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा म्हणजेच ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचे परिपत्रक एमपीएससीने आजच जारी केले आहे.

एमपीएससीने सन २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाच्या दावा केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमपीएससीन सन २०२० मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा अशा चार जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. या चारही जाहिरातींसाठी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता एमपीएससीने ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले असून उमेदवारांना या दोनपैकी एक पर्याय निवडता येईल, असे एमपीएससीने आज जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रात आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे आठ रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती

कसा निवडाल ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय?:

  • एमपीएससीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे ५ जानेवारी ते १५ जानेवारी रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत संबंधित परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवाराने खुला प्रवर्ग किंवा ईडब्ल्यूएस यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यावयाचा आहे, याबाबतचा पर्याय देणे आवश्यक आहे.
    हेही वाचाः नामांतराचे राजकारण पेटलेः औरंगाबादनंतर आता पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करण्याची मागणी
  • खुला प्रवर्ग किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा विचार फक्त खुल्या प्रवर्गातील पदांवरील निवडीसाठी करण्यात येईल.
  • ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेतल्यास ते उमेदवार पुन्हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.
  • एमपीएससीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे विहित कालावधीत पर्याय सादर केलेल्या अथवा पर्याय सादर न केलेल्या उमेदवारांच्या दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतर कोणत्याही टप्प्यावर आणि कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, असे एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा विभागाच्या सहसचिवांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा