एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुन्हा पुढे ढकलली, उमेदवारांचा हिरमोड

0
62

मुंबईः राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) १४ मार्च रोजी होणारी  राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी केलेल्या उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.  एमपीएससीने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.  या परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश कळवली जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे.

मार्च २०२० मध्ये होणारी एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेची पूर्ण तयारीही झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्रांचे वितरण करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे ठरले होते. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

आता ही परीक्षा येत्या १४ मार्च रोजी होणार होती. मात्र मदत आणि पुनर्वसन विभागाने १० मार्च रोजी  एमपीएससीला पत्र लिहून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत अशल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेणे योग्य होणार नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलावी, असे मदत आणि पुनर्वसन विभागाने म्हटले होते. त्यामुळे एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.तब्बल वर्षभराने तरी ही परीक्षा होत असल्यामुळे उमेदवारांनी या परीक्षेची तयारी केली होती. मात्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवार संताप व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा