एसटी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई अखेर मागे, एसटी महामंडळाने जारी केले परिपत्रक

0
268
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गेल्या पाच महिन्यांपासून संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याबाबत आज एसटी महामंडळाने परिपत्रक जारी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेली निलंबन तसेच बदलीची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

जे कर्मचारी कामावर रूजू होऊ इच्छितात, त्यांना तत्काळ कामावर रूजू करून घ्यावे, ज्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, किंवा ज्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे, ती मागे घेण्यात आली आहे. मात्र बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यात आलेला नाही. ज्या एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, त्यांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार अपील करावे लागणार आहे. ज्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केले आहे, त्यांचे प्रकरण चार आठवड्यात निकाली काढण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्यांना संपकाळातील वेतन मिळणार नसल्याचेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. २२ एप्रिलनंतर कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

हेही वाचाः वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई

 ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत, ते २२ एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कामावर हजर झाल्यास त्यांची सेवासमाप्ती तत्काळ रद्द करावी, मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये, असेही एसटी महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध संपकाळात गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनी २२ एप्रिल किंवा तत्पूर्वी हजर होण्याची इच्छुकता दर्शवल्यास, त्यांना हजर करून घ्यावे. कोरोना काळात मृत्यू झालेल्या एसटी अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांचे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता पात्र असलेले प्रलंबित अर्ज चार आठवड्यांच्या आत निकाली काढण्यात यावेत, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा