कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी बसस्थानके, आगार गहाण ठेवून काढणार दोन हजार कोटींचे कर्ज

0
143
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचा तोटा सोसाव्या लागलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळ बसस्थानके आणि आगार या आपल्या मालमत्ता बँकांकडे गहाण ठेवून दोन हजार कोटींचे कर्ज काढणार असून त्यातून कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीच ही माहिती दिली.

कोरोना संकटामुळे एसटीची उत्त्पनाची साधनेच बंद झाली आहेत. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे. आता दिवाळी सण असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणे गरजेचे आहे. त्यासाठी परिवहन विभागाने सरकारकडे ३ हजार ६०० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. मात्र राज्याचीच आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे परिवहन विभागानेच कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे.

 दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येईल. बँकांकडे एसटी महामंडळाची पत चांगली आहे. दोन हजार कोटींच्या कर्जासाठी बँकांकडे एसटी आगार आणि स्थानके गहाण ठेवण्याचा एसटीचा विचार आहे. काही विशिष्ट काळासाठीच एसटीची ही मालमत्ता बँकांच्या ताब्यात राहील. कर्जाचे पैसे दिल्यानंतर मालमत्ता परत घेतली जाईल, असे परब यांनी म्हटले आहे.

सरकारनेच कर्जरोखे काढावेः दरम्यान, मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढण्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विरोध केला असून मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. कर्ज उभारण्याची राज्य सरकारची क्षमता आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच कर्जरोखे काढून एसटीला मदत करावी, असे दरेकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा