औरंगाबादेत आता ‘एमटीडीसी’चे जपानी रेस्टॉरंट

0
47

मुंबई : अजिंठा आणि वेरुळ या ठिकाणी असलेला बौद्ध जपानी पर्यटकांचा ओघ पाहता या पर्यटकांच्या सोयीसाठी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) जपानी रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एमटीडीसीच्या पर्यटक निवासातील उपहारगृहात भारतीय खाद्यपदार्थांबरोबर आता जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे जपानी पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. अशी माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.

जपानी खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणारे एमटीडीसी हे देशातील पहिले शासन अंगीकृत महामंडळ आहे. जपान येथील वाकायामा प्रांतातील शिष्टमंडळाच्या हस्ते रेस्टॉरंटचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. शिष्टमंडळात वाकायामा प्रांताचे विधीमंडळ सदस्य तसेच वाकायामाचे भारतामधील प्रतिनिधी होते. शिष्टमंडळाचे महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे एमटीडीसीचे मुख्य लेखाधिकारी दिनेश कांबळे यांनी स्वागत केले. उद्घाटनानंतर शिष्टमंडळाने उपहारगृहातील जपानी खाद्यपदार्थं सुशी, टेंपुरा, रामेन नुडल्स, चिकन तुरीनोकरागे, मीसोसुप याबरोबरच भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

वाकायामा प्रांतातील विधीमंडळ सदस्य नाकाशीनी म्हणाले, जपानी लोकांना भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. त्यामध्ये इंडियन करी, चपाती, रोटी, चिकन तंदुरी, समोसा हे विशेष लोकप्रिय आहेत. आता याबरोबरच औरंगाबाद येथे जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध झाल्याने जपानमधील पर्यटकांची मोठी सोय होईल. एमटीडीसीचे हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे, असे त्यांनी नमूद केले. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक काळे म्हणाले, जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांमुळे जपानी पर्यटक औरंगाबाद येथे भेटीकरिता येत असतात. या जपानी उपहारगृहामुळे पर्यटकांना विशेष सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या वाढीस नक्कीच हातभार लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा