नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, भामट्याने तब्बल ४० लाखांना फसवले

0
321
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः विवाह जुळवणाऱ्या एका वेबसाइटवर ओळख झाल्यानंतर सायन येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका भामट्याने तिला तब्बल ४० लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या नर्सने अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नागपूरचा हा तरूण घरी येऊन आईवडिलांनाही भेटून गेल्याचे या नर्सने तक्रारीत म्हटले आहे.

सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या या नर्सने लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवर नोंदणी केली होती. तिचे प्रोफाइल पाहून नागपूरच्या एका तरूणाने तिला रिक्वेस्ट पाठवली. नर्सने ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांचे मोबाइलवर एकमेकांशी बोलणे सुरू झाले.

ऋणाल असे नाव सांगणाऱ्या नागपूरच्या या तरूणाने या नर्सला आपण नागपूरच्या एका बड्या कंपनीत नोकरीला असून आईवडिलांशी पटत नसल्यामुळे स्वतंत्र राहत असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही नर्स तो जे काही सांगेल ते खरे मानू लागली. आपल्याला लघवीची समस्या असून त्यावर उपचारासाठी पैसे हवेत, असे सांगत त्याने नर्सकडे पैशांची मागणी केली. सुरूवातीला पाच ते दहा हजार रुपये मागितल्यामुळे नर्सने त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने पगार थांबल्याचे सांगत आणखी पैसे मागितले. जवळपास दीडलाख रुपये दिल्यानंतर नर्सला संशय आला, म्हणून ती पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली.

मग नागपूरचा हा भामटा एकटा मुंबईत आला. सायन कोळीवाडा येथील नर्सच्या घरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला. आईवडिलांना घेऊन येतो असे सांगून तो पुन्हा नागपूरला गेला. नागपूरला परतल्यानंतरही वेगवेगळी कारणे सांगत त्याने पैसे मागणे सुरूच ठेवले.

मला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पगार नसल्यामुळे पैशांची खूप गरज आहे, असे सांगत त्याने पैसे मागितले. नर्सने त्याला पुन्हा पैसे पाठवले. असे करत त्याने नर्सकडून तब्बल ४० लाख रुपये उकळले, असे नर्सने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा