नीता भाभी, मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है…. बेवारस कारमध्ये मुकेश अंबानींना धमकीचे पत्र

0
207
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया हा अलिशान निवासस्थानापासून काही अंतरावरच गुरूवारी सायंकाळी एक बेवारस कार सापडली होती. या कारमध्ये जिलेटीनच्या २० कांड्या सापडल्या होत्या. या कारमध्ये पोलिसांना एक धमकीचे पत्र सापडले असून नीता भाभी, मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है…. अशी धमकी त्यात देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या असून पोलिसांनी अंबानी यांच्या बंगला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

मुंबईच्या कंबाल हिल परिसरात मुकेश अंबानी यांचे अँटालिया हे बहुमजली अलिशान निवासस्थान आहे. या निवासस्थानापासून काही अंतरावरच गुरूवारी सायंकाळी एक हिरव्या रंगाची बेवारस स्कॉर्पिओ कार आढळली होती. या कारमध्ये जिलेटीनच्या २० कांड्या आढळून आल्या होत्या.

या कारमध्ये पोलिसांना एक धमकीचे पत्र सापडले आहे. मुंबई इंडियन्स असे नाव असलेल्या बॅगेत हे पत्र आढळून आले. त्यात ‘ये तो सिर्फ एक ट्रेलर है! नीता भाभी, मुकेश भैय्या हे तो सिर्फ झलक है. अलगी बार सामान पुरा होकर तुम्हारे पास आएगा और पुरा इंतजाम हो गया है’ असे या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून आतापर्यंत परिसरातील नऊ लोकांची चौकशी करण्यात आली आहे. गाडी किती वाजता आली, गाडीच्या आजूबाजूला काही हालचाली होत्या का, असे चौकशीत या लोकांना विचारण्यात आले. अंबानींच्या बंगल्याजवळ आढळलेली ही कार चोरीची असून विक्रोळी पोलिसांत आठ दिवसांपूर्वीच चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा