कंगना रनौतला मुंबई पोलिसांचे पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

0
15
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करून कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले असून १० नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही कंगनाला पोलिसांनी समन्स बजावले होते, मात्र ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती.

कंगना रनौतने तिच्या ट्विटर हँडलवरून बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असा तणाव असल्याचे ट्विट केले होते. कंगनाच्या या ट्विटमुळे समाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत मूनवर अली साहील अश्रफ यांनी वांद्रे येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल हिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता आणि तिला समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

कंगनाने महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीनंतर ‘मैं आर रही हूं, जो उखाडना है उखाडलो…’ असे ट्विट करून केंद्र सरकारने दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेच्या गराड्यात कंगना मुंबईत आली होती. परंतु आता वांद्रे पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर मात्र ती चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करत आहे.

यापूर्वी वांद्रे पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर घरातील लग्न कार्यात व्यस्त असल्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे कारण तिने दिले होते. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी तिला पुन्हा एकदा समन्स बजावले असून १० नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता कंगना चौकशीला हजर राहते की पुन्हा काही कारणे सांगून उपस्थित राहणे टाळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा