ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतची होणार चौकशीः गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

0
734
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बेफाम आणि बेताल वक्तव्य करून कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारी अभिनेत्री कंगना रणौत हिचा भोवती महाराष्ट्र सरकारने फास आवळण्यास सुरूवात केली असून ड्रग्ज प्रकरणी कंगना रणौतचीही चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. दरम्यान, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगनाच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. सरनाईक यांच्या तक्रारीला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणी कंगना रणौतचीही चौकशी केली जाईल, असे सांगितले.

कंगना रणौतचे अध्ययन सुमन यांच्या सोबत प्रेमसंबंध होते. कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी करते, असे सुमन अध्ययन सुमनने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याआधारे आता मुंबई पोलिस ड्रग्ज प्रकरणी कंगना रणौतचीही चौकशी करतील, असे देशमुख म्हणाले.

हेही वाचाः ‘देशभक्त’ कंगना रणौतने केले मुंबईत बेकायदेशीर बांधकाम, महापालिका चालवणार हातोडा!

 विधान परिषदेत हक्कभंग प्रस्तावः दरम्यान, कंगना रणौतविरुद्ध विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगनाच्या विरोधात हा हक्कभंग प्रस्ताव मांडला. हा केवळ हक्कभंग नसून कंगना रणौतने मुंबई आणि महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे. कंगना रणौत आपणाला कोकेन घेण्यास सांगत होती, असे २०१६ मध्ये अध्ययन सुमनने सांगितले होते. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते. त्यामुळे हा हक्कभंग आणला आहे, असे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.

कंगना रणौतवरून गेल्या आठवडाभरापासून वाद सुरू आहे. तिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक झालेली असतानाच तिच्या वक्तव्याशी असहमती दर्शवत भाजपने मात्र तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते किरिट सोमय्या, राम कदम यांनी कंगना रणौतची बाजू घेतली होती. तर मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी आधीच स्पष्ट केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा