मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्यच बनले राज्यातील सत्तेच्या ‘वाटाघाटी’चे केंद्र!

1
89
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचे एक प्रमुख लक्ष्य असलेले नरीमन पॉइंट परिसरातील हॉटेल ट्रायडेंट नोव्हेंबर महिन्यातच राज्यातील सत्तेच्या वाटाघाटीचे केंद्र बनले आहे.

महायुती करून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजप- शिवसेनेचे बिनसल्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच करायचा, यासाठी कंबर कसलेल्या शिवसेनेने भाजपला वगळून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू केल्या आहेत. याच वाटाघाटींचा भाग म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते नव्या सरकारच्या स्थापनेवर चर्चा करण्यासाठी हॉटेल ट्रायडेंटमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी भेटले. त्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अहमद पटेल यांची पहिली भेट हॉटेल ट्रायडेंटमध्येच झाली होती. तर बुधवारच्या दुसऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अन्य काँग्रेस नेते हजर होते. सत्तेच्या वाटाघाटीसाठी झालेली ही शिवसेना आणि काँग्रेसमधील पहिली अधिकृत बैठक होती. याच बैठकीमुळे दोन्ही पक्षांतील चर्चेची दारे खुली झाली आहेत.

 काँग्रेस नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक झालीच नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले असले तरी पटेल आणि ठाकरे यांची पहिली बैठक हॉटेल ट्रायडेंटमध्ये मंगळवारी झाली होती. त्यासाठी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या मागच्या प्रवेशद्वारे बाहेर पडून हॉटेल ट्रायडेंटमध्ये पोहोचले होते, असा दावा मुंबई मिररने केला आहे. 2008 च्या नोव्हेंबर महिन्यातच 26 तारखेला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे हॉटेल ट्रायडेंट हे एक प्रमुख लक्ष्य होते. योगायोगाने नोव्हेंबर महिन्यातच हे हॉटेल सत्तेच्या वाटाघाटीचे प्रमुख केंद्र बनले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा