मौलवींचा उलेमा बोर्ड वंचित बहुजन आघाडीसोबत, ते सांगतील तेच २५ मुस्लिम उमेदवार देणार : प्रकाश आंबेडकरांची घोषणा

1
5635

औरंगाबाद : हैदराबादचे खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्या एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर आता मुस्लिम मौलवींचा ऑल इंडिया उलेमा बोर्ड या मौलवींच्या संघटनेने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. उलेमा बोर्ड सांगेल त्यानुसार राज्यात विधानसभेला २५ मुस्लिम उमेदवार दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

  जालना येथील सत्ता संपादन मेळाव्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी औरंगाबादेत शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आमच्यापासून वेगळे होत स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय एमआयएमने स्वतःहोऊन  घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही युतीचा धर्म पाळला, असे सांगत त्यांनी एमआयएमच्या मतलबी भूमिकेवर शंका उपस्थित केली. वंचित आघाडी विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा लढविणार आहे. चंद्रपूर येथील शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्षातील काही संघटना, लाल निशान, माकप, भाकपनेही वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारीच ऑल इंडिया उलेमा बोर्ड या मौलवींच्या संघटनेसोबत बैठक झाली. चर्चेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आता मुस्लीम उमेदवार दिले जातील. वंचित बहुजन आघाडी मुस्लिमांना २८८ पैकी २५ जागा देणार आहे. या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी निश्‍चित करून उमेदवार जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अ‍ॅड. आंबेडकरांना आरएसएसची फूस असल्याचा आरोप केला होता. त्यावर अशा प्रकारचे आरोप काही नवीन नाहीत. आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढतो आहोत. टीका करणारांनी जरा भान ठेवून टीका करावी, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी जलील यांना लगावला.

 भीती केवळ ईव्हीएमची

  निवडणुकीतील मतदानाबाबत अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, मला कोणाचीही भीती नाही. भीती आहे ती केवळ ईव्हीएमची. जो सत्ताधारी होतो, तो ईव्हीएमचे समर्थन करतो. ईव्हीएम हॅक होते आहे, हे मात्र खरे आहे. काही हॅकर्स मला मध्यंतरी येऊन भेटले. त्यातील एकाने ईव्हीएम हॅक कसे होते याचे पुरावेच दिले आहेत. सध्या प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्याचे पुरावे आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत.

आगामी सात वर्षांपर्यंत मंदीची लाट

देशात सध्या आर्थिक मंदी आहे. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र चिंता व्यक्‍त केली आहे. नोटबंदी, जीएसटीचे गंभीर परिणामआता  देशाच्या अर्थकारणावर होत आहे. लोक भयभीत झाले आहेत. बेरोजगारीमुळे स्थलांतर वाढले आहे. राष्ट्रीय बँका डबघाईला आल्या आहेत. हीच भाजप सरकारच्या १०० दिवसांतील उपलब्धी आहे, असे सांगत आगामी सात वर्षे आर्थिक मंदीची स्थिती गंभीर राहणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचाएमआयएम- वंचितमधील फाटाफूटः ‘बडे भाई’ बाळासाहेबांवरील ओवेसींचे प्रेम असे कसे आटले?

एक प्रतिक्रिया

  1. छाेटे भय्या बडे भय्याकी ताकदसे महाराष्ट्रमे आपणी ताकद बढानेकी साेच रहे थे लेकीन अपने समाजके व्हाेट वंचीतके तरफ लानेमे असफल रहे ईसकाही यह नतीजा है

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा