२५० वर्षे जुना रेड लाइट एरिया तडकाफडकी बंद, नागपुरातील सेक्स वर्कर्सची उपजिवीका धोक्यात

0
382
छायाचित्र सौजन्यः द वायर

नागपूरः नागपूर शहराच्या मध्यभागी असलेला गंगा जमुना हा २५० वर्षांपेक्षाही जुना रेड लाइट परिसर तडकाफडकी बंद केला आहे. गंगा जमुनाकडे जाणाऱ्या १६ पैकी १५ रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. या प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर किमान तीन पोलिस कर्मचारी सीसीटीव्हीसह सज्ज असलेल्या पोलिस व्हॅनसह सज्ज असलेले पहायला मिळत आहेत. तीन एकरावर पसरलेल्या या परिसरात ‘उपद्रव’ किंवा ‘संभाव्य धोका’ टाळण्यासाठी या परिसरात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

या परिसरात बाहेरून जाणाऱ्या व्यक्तीला विशेषतः पुरूषाला आतमध्ये जाण्याआधी हटकले जात आहे. त्याच्या भेटीचा हेतू विचारला जात आहे. या परिसरात राहणाऱ्या दोन हजारांहून अधिक महिलांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या त्यांच्या घराबाहेर पडताना क्वचितच दिसतात. त्यापैकी काही जणी एकट्या तर बहुतांश जणींना लहान मुले आहेत. नागपूर पोलिसांच्या या तडकाफडकी कारवाईमुळे या हजारो सेक्स वर्कर्सची उपजिवीकाच धोक्यात आली आहे. ‘द वायर’ने हे वृत्त दिले आहे.

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ११ ऑगस्ट रोजी गंगा जमुना हा रेड लाइट परिसर बंद करण्याचे तडकाफडकी आदेश काढले. त्यामुळे संपूर्ण गंगा जमुना परिसर अक्षरशः बेरोजगार झाला आहे. या तडकाफडकी आणि एकतर्फी कारवाईमुळे गंगा जमुनातील महिलांना संपूर्ण ऑगस्ट महिना एक छदामही उत्पन्न मिळाले नाही.

 पोलिसांच्या आकडेवारीनुसार गंगा जमुना परिसरात १८८ कुंटणखाने चालतात. त्यापैकी ३० बहुमजली इमारतीत तर काही लहान इमारतीत चालतात. गंगा जमुनामध्ये राहणाऱ्या महिलांना दैनंदिन, आठवडी किंवा मासिक तत्वावर हे कुंटणखाने भाडे आकारतात. हे बहुतांश कुंटणखाने महिलाच चालवतात. त्यापैकी बहुतांश जणी त्यांच्या तारूण्यात सेक्स वर्कर्स होत्या. त्यांनी पै-पैसा जमवून या परिसरात घरे विकत घेतलेली आहेत. अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायदा १९५६ नुसार कुंटणखाने चालवणे हा शिक्षेसपात्र गुन्हा आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना या कायद्यानुसार ‘पीडित’ मानले जाते आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हा कायदा सांगतो.

गंगा जमुनातील काही महिलांना कायदेशीर सहाय करणारे मानवी हक्कासाठी लढणारे वकील निहालसिंग राठोड यांनी ‘द वायर’शी बोलताना अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायद्यात १९७८ मध्ये करण्यात आलेल्या दुरूस्तीकडे लक्ष वेधले. त्यानुसार ‘व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेला देह व्यापार बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. परंतु स्वेच्छेने देह व्यापार करणाऱ्या सेक्स वर्कर्सना गुन्हेगार संबोधले जाऊ शकत नाही. महिला स्वेच्छेने सेक्स वर्क हा व्यवसाय म्हणून निवडू शकतात आणि त्यांच्यावर कोणतीही आडकाठी किंवा फौजदारी कारवाई करता येणार नाही, असेही राठोड म्हणाले. पोलिसांनी केलेल्या या तडकाफडकी कारवाईनंतर स्थानिक स्वराज संस्था किंवा राज्य सरकारकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नसल्याचे येथील एका महिलेने सांगितले. त्यामुळे येथील सेक्स वर्कर्सची उपजिवीकाच धोक्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा