नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार, पण खरेंनी नाकारला पुरस्कार

0
61

नवी दिल्ली: प्रसिध्द लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’  या कांदबरीस वर्ष २०२० साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. तसेच प्रसिध्द बाल साहित्यिक आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मात्र नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारला आहे.

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२०’ ची आज घोषणा झाली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २० भाषांकरिता ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तसेच २१ लेखकांना ‘बाल साहित्य पुरस्कार’ तर १८ भाषांकरिता ‘युवा पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

साहित्य अकादमीने २० प्रादेशिक भाषांतील सात कविता संग्रह, चार कादंब-या, पाच कथा संग्रह ,दोन नाटके, एक संस्मरण आणि एक महाकाव्य या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात मराठी भाषेसाठी प्रसिध्द लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात  पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता.  मल्याळम, नेपाळी , उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.

उद्या कादंबरी अशीः   ‘उद्या’ हा मागील तीनशे वर्षांपासूनचा लेखकाच्या मनातील सल आहे. लेखकाने कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमानाचा वेध घेत या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट सादर केला आहे. या कादंबरीत  सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर सहजगत्या प्रकाश टाकला आहे. सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी हा अभिव्यक्ती व वर्तन विश्लेषक आहे. सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या  प्रमुख नेत्याचा लेखनिक आहे.अशा प्रकारे कादंबरीतील सर्व पात्रांना या कादंबरीत उत्तमरित्या न्याय देण्यात आला आहे.

आबाची गोष्टबाल साहित्य पुरस्काराची मानकरीः साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी २१  प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्यामधून आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी  विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता डॉ. चंद्रकांत पाटील, कृष्णात खोत आणि के.टी. ठाले पाटील यांचा परीक्षक मंडळामध्ये समावेश होता.

मराठी भाषेसाठी युवा पुरस्काराची लवकरच घोषणाः साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या युवा पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली.  एकूण १८ प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

पुरस्कार नाकारताना खरे म्हणतात… आजवर वाचकांनी मला भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे मी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत तो विनम्रतेने नाकारत आहे. जेव्हा कोरोना काळात जगातील बहुतांश जनता हाल सहन करत होती, तेव्हा मोजक्या अब्जाधीशांची संपत्ती कित्येक पटींनी वाढली आहे. हे आधुनिक बाजार व्यवस्थेत कसे काय घडते याचा वेध घेत या नव्या बाजार व्यवस्थेचे विविध पैलूसमोर आणण्याचा प्रयत्न आपल्या लेखनातून करणार, असे नंदा खरे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा