नांदेडः प्रजिमा ५९ चे काम परस्पर वळवून हडेलहप्पी करणाऱ्या अभियंत्यांची होणार खातेनिहाय चौकशी?

0
128
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील प्रजिमा ५९ चा मूळ मंजूर नकाशा.

औरंगाबादः  नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या लोहा सार्वजनिक बांधकाम उपविभागातील प्रजिमा ५९ चे काम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे न करता ते परस्पर वळवून हडेलहप्पी करणाऱ्या अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी शाखेला विनाविलंब माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. आता मनमानी करून हडेलहप्पी करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध नेमकी काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातून जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग म्हणजेच प्रजिमा ५९ चे काम मंजूर अंदाजपत्रक आणि आराखड्यानुसार न करता ते दुसरीकडेच वळवून अनधिकृतपणे त्याचे कामही सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर हे काम तातडीने थांबवून मूळ मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकाप्रमाणेच काम करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोहा उपविभागाला देण्यात आले होते. परंतु अनधिकृपणे सुरू केलेले काम तर थांबवण्यात आले, मात्र मूळ मंजूर आराखडा धाब्यावर बसवून या रस्त्याचे काम दुसरीकडेच वळवणारे संबंधित अभियंतेमात्र नामानिराळे राहिले.

हेही वाचाः नांदेड जिल्ह्यातील प्रजिमा ५९ चे काम भलतीकडेच वळवणाऱ्या अभियंत्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत प्रजिमा ५९ हा माळाकोळी- नागदरवाडी-घुगेवाडी-होना तांडा- मजरेसांगवी-दगडसावंगी- ते कुरूळा अशी मंजुरी मिळालेली असताना या रस्त्याचे काम  अनधिकृतपणे माळाकोळी- वागदरवाडी-चोंडी मार्गे वळवून त्याचे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र अभियंत्यांच्या हडेलहप्पीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे काम थांबवण्यात आले आणि मूळ मंजूर आराखड्याप्रमाणेच हे काम करण्याचे निर्देश देण्यात आले खरे. परंतु ही बाब लक्षात येईपर्यंत अनधिकृतपणे वळवलेल्या मार्गावर बरेचसे कामही झालेले होते. आता हा खर्च नेमका कुणाच्या खिशातून वसूल करणार? हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आता या प्रकरणी नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी शाखेला १ एप्रिल २०२२ रोजी एक पत्र देऊन अभियंत्यांच्या या हडेलहप्पीची माहिती विनाविलंब संकलित करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हे अनधिकृतपणे वळवलेले काम थांबवून मूळ मंजूर आराखड्याप्रमाणेच काम करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतरही गेली सहा महिने कोणत्याही कारवाईविना नामानिराळे राहिलेले संबंधित शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्यांच्याविरोधात आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यूजटाऊनच्या बातम्यांंबद्दल आपल्या प्रतिक्रिया आवश्य कळवाः व्हॉट्सअप क्रमांक: 9823427325 किंवा ईमेलः m.newstown@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा