नाशिकचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन स्थगीत, आता मेमध्ये होणार आयोजन

0
48

नाशिकः कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगीत करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज रविवारी एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे किंवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांमधून निघत होता. नाशिकमध्ये सद्यस्थितीत कोरोना संसर्गाची परिस्थिती फारशी चिंताजनक नसली तरी बाहेरून येणाऱ्या साहित्यिक-रसिकांकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली जात होती. पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होऊ लागला आहे. त्यामुळे आयोजकांनी हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकचे साहित्य संमेलन तोंडावर आलेले असतानाच या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अद्याप काढण्यात आली नव्हती. संमेलनाचे उद्घाटक किंवा समारोपाचे पाहुणेही निश्चित करण्यात आले नव्हते. संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाली आहे. साहित्य संमेलनाच्या अनेक समित्यांचे कार्यकर्तेही कोरोना बाधित झालेले आहेत. त्यामुळे नसते बालंट नको म्हणून हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे साहित्य संमेलन मार्चऐवजी आता मे महिन्यात होणार असल्याचे ठाले पाटील यांनी कळवले आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून खबरदारी म्हणून हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलन पुढे ढकलले असले तरी संमेलनाच्या नियोजनाच्या बैठका सुरू राहतील. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. संमेलनाच्या कार्यालयात विशेष दक्षता घेतली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा