बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतलीः देवेंद्र फडणवीस

0
97
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करणारे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवाब मलिकांवर आरोप केले. नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा आरोप केला. सलीम पटेल कोण होता? त्याने इतक्या स्वस्तात तुम्हाला ही जमीन का विकली? असे सवालही फडणवीसांनी केले.

मी घोषणा केली होती की, काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला, कारण कागद गोळा करत होतो. काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरी नाही आणि इंटरव्हलनंतरपचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला मुद्दा आहे, असे म्हणत फडणवीसांनी हे आरोप केले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सरदार शहावली खान हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरूंगात आहे. शाहवली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांचे नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध असून मलिकांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने त्यांच्याकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केली, असा आरोप फडणवीसांनी केला.

मुंबईतील कुर्ला भागातील एलबीएस रोडवर गोवावाला कम्पाऊंड नावाची ही जमीन आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सॉलिडस कंपनीने २००७ मध्या जमिनीची पॉवर ऑफ ऍटर्नी असलेल्या शाहवली खान व सलीम पटेल यांच्याकडून ही जमीन खरेदी केली. तीन एकर जमीन अवघ्या ३० लाखांत खरेदी केली गेली. त्यातलेही २० लाख रुपये दिले गेले, असे फडणवीस म्हणाले.

स्वतः नवाब मलिक हे काही वर्षांपूर्वीपर्यंत सॉलिडस कंपनीत संचालक होते. कालांतराने त्यांनी राजीनामा दिला. परंतु आजही त्यांचे कुटुंबीय या कंपनीत आहेत. राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नवाब मलिकांना अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन घेण्याची गरज का भासली? हे लोक गुन्हेगार आहेत हे त्यांना माहीत नव्हते का? टाडाच्या आरोपींची जमीन नियमांनुसार जप्त केली जाते. ही जप्ती येऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता का? असे प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केले.

मी कागदपत्रे लवकरच योग्य यंत्रणेकडे देईन. ही योग्य यंत्रणा मुंबई पोलिस आहेत, सीबीआय आहे, ईडी आहे की एनआयए याची माहिती लवकरच घेतली जाईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा