प्रशांत किशोर- शरद पवार यांची पुन्हा दिल्लीत भेट, भाजपविरोधात मोट बांधण्याची रणनिती?

0
17
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची आज पुन्हा नवी दिल्लीत भेट झाली. गेल्या दहा दिवसांतील दोघांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी म्हणून या भेटीकडे पाहिले जात असून उद्या दुपारी ४ वाजता शरद पवार हे १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणाविरोधात उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय मंचात १५ राजकीय पक्षांचा समावेश आहे. या मंचाची उद्या बैठक होणार असून या बैठकीपूर्वी दोघांची झालेली ही भेट महत्वाची मानली जाते.

शरद पवारांना भाजपविरोधी आघाडीचे एक प्रमुख नेते म्हणून पाहिले जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपविरोधात मोठा विरोधी मोर्चा उभारण्याच्या रणनितीवर शरद पवार बऱ्याच दिवसांपासून काम करत आहेत. त्याचे संकेत त्यांनी स्वतःच अनेकदा दिले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मोठा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दुसऱ्यांदा झालेली भेट बंगाल मॉडेल देशात किंवा राज्यात लागू होऊ शकते का? यावर उभयतांत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

मोदी सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रीय मंचची स्थापना यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सध्या ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. या राष्ट्रीय मंचची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणार आहे. हा राष्ट्रीय मंच राजकीय नसला तरी त्यात १५ राजकीय पक्षांचा समावेश आहे. या १५ पक्षांचे नेते उद्या दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहणार असल्याचे सांगितले जाते. या राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातूनच तिसरा राजकीय पर्याय उभा करण्याची रणनिती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून या रणनितीत प्रशांत किशोर महत्वाची भूमिका बजावू शकतात.

यापूर्वी ११ जूनला शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत भेट झाली होती. दोघांनी एकत्र जेवणही घेतले होते. या भेटीविषयी शरद पवार यांच्या कार्यालयाकडून ही केवळ शिष्टाचार भेट असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची भक्कम मोट बांधण्यावर आणि भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा