आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंयः शरद पवारांचा खोचक टोला

0
2450
संग्रहित छायाचित्र.

अहमदनरः एक-दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागले आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे जुने सहकारी मधुकर पिचड यांना नाव न घेता लगावला.

 अकोले येथे माजी आमदार के.यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण आज पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी अकोलेत सभा घेतली होती, त्याचवेळी जनतेच्या मनातले कळले होते. जनतेला परिवर्तन हवे होते, ते झाले आहे, असे म्हणत शरद पवार यांनी पिचड यांचा अप्रत्यक्षपणे चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचाः मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर फाईलमध्ये परस्पर फेरफार, चौकशीचा आदेशच फिरवला

अकोलेतील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याचे मला कळले. कारखान्यावर २०० कोटींचे कर्ज झाले आहे. या कर्जाला जे जबाबदार आहेत, त्या शुक्राचार्यांना बाजूला करा. कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत मी करतो, असेही शरद पवार म्हणाले.

मधुकर पिचड हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जायचे. १९९९मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी मधुकर पिचड एक होते. शरद पवारांनी पिचडांवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या होत्या. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

यावेळी शरद पवार यांनी शालेय जीवनातील आठवणीही सांगितल्या. भंडारदरा हा माझा आवडता परिसर आहे. ९ वीत शिकत असताना सर्वात पहिल्यांदा मी सायकलवर रंधा फॉल पाहण्यासाठी लोणी ते भंडारदरा सायकलवर आलो होतो. असे सांगतानाच अकोले आणि भंडारदरा भागातील लोकांना दुर्लक्षित करू नका, असा सल्लाही शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक आश्वासने दिली. त्याचा उल्लेख करत दिलेली आश्वासने पूर्ण करा, असेही पवारांनी मुश्रीफ यांना बजावले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा