शरद पवार दिग्गज राजकीय नेते; त्यांनी अनेक सरकारे स्थापन केली, पाडलीहीः अमित शहा

0
13064
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे दिग्गज राजकीय नेते असून त्यांनी अनेक सरकारे स्थापन केली आहेत आणि पाडलीही आहेत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजकारणातील खरा चाणक्य कोण? या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव झाल्यानंतर अमित शहा यांची राजकीय जादू फिकी पडत चालली असल्याची चर्चा रंगत असतानाच त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या समिटमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘तुम्ही चाणक्यची पदवी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना दिली आहे का?, असा असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी चाणक्य खूप वाचला. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रतिमाच एवढी मोठी आहे की, त्यांच्याशी तुलनेचा विचारही करू शकत नाही. मी भगवान कौटिल्यांच्या बाबतीतही स्वतःच्या तुलनेचा विचार करू शकत नाही. राहिला प्रश्न शरद पवारांचा. तर त्यांनी अनेक सरकारे स्थापन केली आहेत. पाडलीही आहेत. ते दिग्गज राजकीय नेते आहेत, असे अमित शहा म्हणाले. शहा यांचे उत्तर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

हेही वाचाः पवारांवर पीएच.डी. करण्याआधी पोस्टग्रॅज्यूएट व्हाः रुपाली चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला १६१ जागा म्हणजेच स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून ही युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असतानाच भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले होते. मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वच आमदार आपल्या बाजूने असल्याचे दाखवून दिल्यानंतर हे सरकार कोसळले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. भाजपकडे सर्वाधिक १०५ जागा असूनही त्यांच्यावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. या सर्व घटनाक्रमामागे शरद पवारांचा हात असल्याचे संगण्यात येते. त्यामुळे शरद पवारांना राजकाणातील चाणक्य संबोधण्यात येऊ लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा