दिल्लीत खलबतेः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट, २० मिनिटांच्या भेटीने चर्चांना उधाण

0
268
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाईचे सत्र सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये प्रधानमंत्री कार्यालयात सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा चाललली. दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी या दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपकडून होत असलेले आरोप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठीमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या दोन नेत्यांची प्रधानमंत्री कार्यालयात भेट झाली. या दोन नेत्यांदरम्यान सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी फक्त हे दोघेच नेते उपस्थित होते. या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र महाराष्ट्रात सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या महत्वाची भेट म्हणून पाहिले जात आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

विशेष म्हणजे मंगळवारी शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्रातील आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहभोजनाला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील हजर होते. यावेळी शरद पवार आणि गडकरी यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज शरद पवार हे नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नव्हे- मुनगंटीवारः दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे राजकीयदृष्टीने पाहू नका, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भाजपची कटुता राष्ट्रवादी काँग्रेसशी नव्हे तर शिवसेनेशी आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. नवाब मलिक किंवा अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक आहेत, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले असल्यामुळे ही भेट नव्या राजकीय भूकंपाची नांदी तर ठरणार नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकीकडे कटुता नाही म्हणतानाच या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असेही मुनगंटीवार म्हणाले. नितीन गडकरीदेखील शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थित होते. आज पवार आणि मोदी यांची भेट झाली. पण यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. हा एक राजकीय परंपरेचा भाग आहे. विचारांचे मतभेद असले तरी मनभेद असण्याची गरज नाही, असे मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. दोघांमध्ये राजकीय किंवा महाराष्ट्राबद्दल काही चर्चा झाली का हे सांगण शक्य नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

मिटकरींनी घेतला मुनगंटीवारांचा समाचारः दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या भेटीवर प्रतिक्रिया आली आहे. सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना भेटत असतात. शरद पवारांना ५५ वर्षांच्या संसदीय राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. त्याबद्दलही या भेटीत चर्चा झाली असावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. मिटकरी यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. केंद्रीय तपास यंत्रणांनी कसलेही तथ्य नसताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष नाही तर कुटुंब आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आमच्यासाठी महत्वाचे असून त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीचीच आहे, असे मिटकरी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा