मोदींशी फक्त राऊतांवरील कारवाई, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर चर्चाः शरद पवार

0
155
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले असतानाच खुद्द पवार यांनीच दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अडकवून ठेवलेला राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा प्रश्न मोदींच्या कानावर घातला, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी बुधवारी साडेबारा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री कार्यालयात भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या चर्चेचा तपशील पवार यांनीच त्यांच्या ६, जनपथ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिला.  या भेटीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल मोदींना काही सांगितले का, असे पत्रकारांनी विचारले असता, मी केवळ एका पत्रकारावरील कारवाईविषयी प्रधानमंत्री मोदींशी बोललो. ते पत्रकार म्हणजे संजय राऊत असे पवार म्हणाले.

हेही वाचाः दिल्लीत खलबतेः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट, २० मिनिटांच्या भेटीने चर्चांना उधाण

संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. ईडीने संजय राऊत यांचा मुंबईतील फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमिनीवर टाच आणल्याचे काल समजले होते. मी ही गोष्ट प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. संजय राऊत यांच्यावरील कारवाई अयोग्य आहे. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वृत्तपत्राचे संपादक आहे, हे देखील मी प्रधानमंत्र्यांना सांगितले, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचाः नांदेडः प्रजिमा ५९ चे काम परस्पर वळवून हडेलहप्पी करणाऱ्या अभियंत्यांची होणार खातेनिहाय चौकशी?

 प्रधानमंत्री मोदींशी मी फार थोडावेळ बोललो. यावेळी मी विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा उपस्थित केला. राज्यपालांनी १२ आमदारांचा मुद्दा निकाली काढला नाही, असे मी मोदींच्या कानावर टाकले. ते विचार करून निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले. मोदींसोबत लक्षद्विपच्या प्रश्नासंबंधीही चर्चा झाली. लक्षद्विपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय चुकीचे आहेत. त्यामुळे ७५ हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे, असेही मोदींना सांगितल्याचे पवार म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

भाजपसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत आहे. अडीच वर्षे झाले आहेत. हे सरकार उर्वरित काळही पूर्ण करू. महाविकास आघाडी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. पाच वर्षे करून महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा