शरद पवार उद्या मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा घेणार आढावा

0
166
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्यापासून दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. १८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस पवार मराठवाड्यातील बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

राज्याच्या काही भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच मराठवाड्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक गेल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, औसा, परांडा, उस्मानाबाद आणि उमरगा येथील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच अतिवृष्टी झालेल्या विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला अत्यंत तुटपुंजी मदत केल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा