‘… तर देशातील लोक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील’

0
39
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची दखल फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती. पण तशी घेतल्याचे दिसत नाही. हे असेच राहिले तर तर ते दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेतली. त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हा इशारा दिला. मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणासह देशाच्या अन्य भागातील शेतकरी आंदोलन करत आहेत. मागील दहा दिवसांपासून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मारून बसले आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने चर्चेच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. मात्र त्यातून अद्यापही तोडगा निघालेला नाही. मोदी सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांमुळे शेती आणि शेतकरी कॉर्पोरेटच्या कब्जात जातील, त्यामुळे हे तिन्ही कायदे रद्द करा, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी असून ते आपल्या मागणीवर कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. त्यामुळे हे आंदोलन चिघळत चालले आहे.

याच आंदोलनाबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी चिंता व्यक्त केली. संपूर्ण देशाची शेती आणि अन्नपुरवठा बघितला तर सगळ्यात जास्त योगदान पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आहे. विशेषतः गहू व तांदळाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली आहे. त्याचबरोबर जगातील १७-१८ देशांनाही भारत धान्य पुरवठा करतो. त्यात पंजाब आणि हरियाणाचा वाटा मोठा आहे, असे पवार म्हणाले.

ज्यावेळी पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उरतो, तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती. दुर्दैवाने तशी ती घेतल्याचे दिसत नाही. हे जर असेच राहिले तर हे आंदोलन दिल्लीपुरते सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा