राज्यपालांच्या ‘ऐतिहासिक’ कारकिर्दीचे शरद पवारांनी काढले खास पुणेरी भाषेत वाभाडे!

0
1054
संग्रहित छायाचित्र.

मुंबई  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पत्रव्यवहाराद्वारे रंगलेल्या शाब्दिक वादावरची धूळ आणखी शमली नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या आभार पत्रात खास पुणेरी भाषेत चिमटे घेत वाभाडे काढून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आठवणीने आपल्या ‘ऐतिहासिक’ कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच, निधर्मीवादाबद्दल मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राची व त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया यात दिसली नाही, असा टोला पवारांनी लगावला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वप्रकाशित  जनराज्यपाल हे कॉफी टेबल बुक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवले आहे. यावर आपला अभिप्राय कळवत शरद पवारांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज्य सरकारमधील संघर्ष सर्वश्रुत आहे. लॉकडाऊनपासून बंद असलेल्या मंदिरांचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्याच्या मुद्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अत्यंत पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राला त्याच भाषेत उत्तर दिल्याने राजभवन व राज्य सरकारमधील वाद विकोपाला गेला आहे. त्यातच राज्यपालांनी पाठवलेल्या स्वतःवरील पुस्तकाला पोच देताना शरद पवार यांनी तिरकस भाषेत टोलेबाजी करत चांगलेच चिमटे काढले आहेत.

राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात पवार म्हणतात…’महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले ”जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररूप कॉफी टेबल बुक प्राप्त झाले. खरं तर भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा नामोल्लेख कुठे आढळून येत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीने अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, आपल्या एका वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक मला पाठवण्यात आले याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

कॉफी टेबल बुकचे अवलोकन केले असता त्यामध्ये आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद दुसरा वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यासारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या, मान्यवरांच्या गाठीभेटी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम व त्यातील सहभागाची छायाचित्र पाहण्यात आली. मात्र निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद देखील या माहिती पुस्तकात दिसून आली नाही’,  असा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे. पत्राचा शेवट करताना, …’असो आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल मी आपला पुनश्च आभारी आहे’, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा