नवी दिल्लीः केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. पण त्यांनी शांततेचा मार्ग सोडला तर देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण आंदोलक शेतकरी शांततेचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने वळले तर संपूर्ण देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप त्याला जबाबदार असेल. शेतकऱ्यांच्या समस्यांसारखे अनेक मुद्दे आहेत, परंतु केंद्रातील सत्ताधारी त्याबाबत असंवेदनशील आहेत, असा आरोपही पवारांनी केला आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही १० विरोधी पक्षांचे खासदार गेलो होतो. पण आम्हाला शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. तेथील परिस्थिती देशाच्या हिताची नव्हती. आपण या आंदोलनावर लवकर तोडगा काढायला हवा. ज्या परिस्थितीत हे शेतकरी आंदोलन करत आहेत, ते योग्य नाही, असे सुळे म्हणाल्या.
दिल्ली वगळता उद्या शेतकऱ्यांचा देशभर चक्काजामः उद्या शनिवारी शेतकऱ्यांनी देशभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र हा देशव्यापी चक्काजाम दिल्लीत होणार नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन ऑक्टोबरपर्यंत मागे घेणार नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. दिल्लीत राजाने स्वतःच किलेबंदी केली आहे. तेथे आपल्याला चक्काजाम करण्याची गरज नाही. दिल्ली वगळता शेतकरी देशभर चक्काजाम करतील. दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून पाणी आणि अन्न दिले जाईल. सरकार आमच्यासोबत काय करत आहे, हे त्यांना समजावून सांगितले जाईल, असेही टिकैत म्हणाले.